Digital India Nibandh: आजचा काळ खूप वेगाने बदलतो आहे. आधी आपण पत्र लिहायचो, पोस्टमनची वाट पाहायचो. पण आता मोबाईलवर एक बटन दाबलं की संदेश लगेच पोहोचतो. हा सगळा बदल “डिजिटल इंडिया”मुळे झाला आहे. डिजिटल इंडिया म्हणजे आपला भारत देश तंत्रज्ञानाच्या मदतीने पुढे जाणे. गाव असो किंवा शहर, सगळीकडे इंटरनेट आणि डिजिटल सेवा पोहोचवणे, हाच त्याचा मुख्य उद्देश आहे.
मला अजूनही आठवतं, काही वर्षांपूर्वी माझे आजोबा बँकेत पैसे भरण्यासाठी लांब रांगेत उभे राहायचे. उन्हात तासन्तास थांबावं लागायचं. पण आता माझे बाबा मोबाईलवरूनच पैसे पाठवतात. आजोबा हे पाहून खूप खुश होतात. ते नेहमी म्हणतात, “आपला भारत खरंच बदलतो आहे!” हीच तर डिजिटल इंडियाची जादू आहे.
शाळेतही डिजिटल इंडियाचा खूप फायदा झाला आहे. आमच्या वर्गात शिक्षक आता प्रोजेक्टरवरून शिकवतात. चित्रं, व्हिडिओ दाखवतात. त्यामुळे अभ्यास मजेशीर वाटतो. कोविडच्या काळात आम्ही घरबसल्या ऑनलाईन क्लासेस केले. त्या वेळी इंटरनेट नसतं तर आमचं शिक्षण थांबलं असतं. माझ्या एका मित्राकडे मोबाईल नव्हता, तेव्हा आम्ही सगळे मिळून त्याला मदत केली. हे पाहून शिक्षकांनी आमचं खूप कौतुक केलं.
डिजिटल इंडिया मुळे गावांमध्येही मोठा बदल झाला आहे. माझ्या आजीच्या गावात आधी इंटरनेट नव्हतं. आता तिथेही लोक मोबाईल वापरतात, व्हिडिओ कॉल करतात. मी आणि माझी आजी रोज बोलतो. ती मला तिच्या शेतातील गोष्टी सांगते. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद मला स्क्रीनवर दिसतो. हे सगळं डिजिटल इंडियामुळेच शक्य झालं आहे.
आता सरकारच्या अनेक योजना देखील ऑनलाईन झाल्या आहेत. शिष्यवृत्ती अर्ज, आधार कार्ड, रेशन कार्ड – सगळं काम मोबाईल किंवा संगणकावरून होतं. त्यामुळे वेळ आणि पैसे दोन्ही वाचतात. माझ्या बाबांनी एकदा सांगितलं की, “पूर्वी एका कामासाठी अनेकदा ऑफिसला जावं लागायचं, पण आता तेच काम घरबसल्या होतं.” हे ऐकून मला खूप अभिमान वाटला.
मित्रांसोबतही डिजिटल इंडियामुळे मजा वाढली आहे. आम्ही एकमेकांना अभ्यासाचे नोट्स पाठवतो, नवीन गोष्टी शिकतो. पण शिक्षक नेहमी सांगतात की मोबाईलचा वापर योग्य पद्धतीने करावा. जास्त गेम खेळणे किंवा वेळ वाया घालवणे चुकीचे आहे. त्यामुळे डिजिटल इंडिया आपल्यासाठी चांगला आहे, पण त्याचा वापर समजून करायला हवा.
डिजिटल इंडिया फक्त तंत्रज्ञान नाही, तर तो आपल्या देशाचा उज्ज्वल भविष्य आहे. यामुळे शिक्षण, आरोग्य, बँकिंग आणि अनेक क्षेत्रात प्रगती होत आहे. आपण लहान मुलांनीही याचा योग्य उपयोग करून चांगलं शिकायला हवं. नवीन गोष्टी जाणून घ्यायला हव्यात.
शेवटी मला एवढंच सांगायचं आहे की, “डिजिटल इंडिया” हा आपल्या देशाचा अभिमान आहे. आपण सर्वांनी त्याला साथ दिली तर भारत अजून प्रगती करेल. चला, आपणही डिजिटल इंडियाचा भाग बनूया आणि आपल्या देशाला पुढे नेऊया.
1 thought on “Digital India Nibandh: डिजिटल इंडिया निबंध”